मी महाराष्ट्रातच राहणार... शिक्षणमंत्री होण्याच्या चर्चेला मुख्यमंत्र्यांचे उत्तर

Foto
नवी दिल्ली :  नागपूर : दिल्लीला जाण्याच्या चर्चांवरती अखेर देवेंद्र फडणवीस यांनीच पडदा टाकत ते कुठेही जाणार नसून मुंबईत आणि महाराष्ट्रातच राहणार असल्याचे सुतोवाच केले आहेत. मी आज नागपुरात आहे, संध्याकाळी मुंबईत जाणार आहे. मी मुंबईतच आहे, मी महाराष्ट्रातच राहणार आहे, असेही त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले आहे.

नीट पेपरफुटी प्रकरणात विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनानंतर अखेर सरकारला माघार घ्यावी लागली आणि धर्मेंद्र प्रधान यांनी काल शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. दिल्लीत झालेल्या या घडामोडींनंतर महाराष्ट्राच्या राजकारणातही हालचालींना वेग आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तडकाफडकी काल दिल्लीला रवाना झाले. त्यामध्ये त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. मात्र, देवेंद्र फडणवीस  यांनी नेमकी कुणाची भेट घेतली, कुणाशी चर्चा केली याबाबत मात्र कमालीची गुप्तता बाळगण्यात आल्याचे दिसत आहे. 

देवेंद्र फडणवीसांच्या दिल्ली दौर्‍यावरून राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यातच ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केलेल्या एका दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. देशाचे नवे शिक्षणमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांना संधी मिळू शकते असं संजय राऊतांनी म्हटले. त्यामुळे फडणवीसांच्या  दिल्ली दौर्‍यामागचे नेमके कारण काय, याबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे. अशातच आज दिल्ली दौरा आणि दिल्लीला रवानगी होण्याच्या चर्चांवरती आज नागपुरात मुख्यमंत्र्यांनी सविस्तरपणे भाष्य केले आहे. मी आज नागपुरात आहे, संध्याकाळी मुंबईत जाणार आहे. मी मुंबईतच आहे, मी महाराष्ट्रातच राहणार आहे, असंही त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले आहे.  

त्यांना सेलिब्रेशन करता काहीतरी कारण मिळालं याचा मला आनंद
ठाकरे बंधू विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश मिळाल्यानंतर सेलिब्रेशन करताना पाहायला मिळत आहेत. यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले की, चला काही हरकत नाही त्यांना सेलिब्रेशन करता काहीतरी कारण मिळालं याचा मला आनंद आहे, आणि आम्ही देखील आनंदी आहोत. शेवटी अशा प्रकारचे जे प्रश्न असतात. हे कुठल्याही व्यक्तीचे, कुठल्या पक्षाचे प्रश्न नसतात. तर हे तरुणाईला भेडसावणारे प्रश्न आहेत. त्यामुळे त्या संदर्भात मोदीजींनी संवेदनशीलता दाखवत जे काही निर्णय केलेले आहेत. 

देशाच हित महत्त्वाचं असतं. ते लक्षात ठेवून अशा परिस्थितीमध्ये जे काही निर्णय करणं आवश्यक होतं. ते सगळे निर्णय मोदीजींनी केले, आणि आता सोमवारी उद्या मला असं वाटतं की, विधेयक देखील लोकसभेमध्ये त्या ठिकाणी मांडलं जाणार आहे की, ज्यातनं पुढच्या काळामध्ये आमच्या तरुणाईच जे भवितव्य आहे, हे सुरक्षित राहण्याकरता कठोरतम कायदा हा देशाच्या आणि जगाच्या इतिहासात असा कायदा कुठेच झालेला नाही, असा कायदा करण्याचा जो काही निर्णय केलेला आहे. मी खरोखर मोदीजींचे त्याबद्दल आभार मानतो. तर ठाकरेंच्या टीकेवरती उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, मला असं वाटतं की अशा प्रकारचे डायलॉग हे गेल्या दहा वर्षात त्यांनी अनेक वेळा मांडलेले आहेत, पण त्यांचे डायलॉगचा कोणावरही असर होत नाही, संपूर्ण भारत मोदीजींच्या पाठीशी आहे. रात्री एक वाजता टाकलेला मोदीजींचा व्हिडिओ हा इंस्टाग्रामचे जगातले रेकॉर्ड तोडतो, याच्यावरूनच लक्षात येतं की भारत कोणाच्या पाठीशी आहे, असंही पुढे देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.